दिवसा शांतता… रात्री ट्रॅक्टरची धडधड; गावकऱ्यांमध्ये कुजबूज वाढली
भद्रावती प्रतिनिधी ✍️
भद्रावती तालुक्यातील “अदृश्य रेती प्रकरण” आता आणखी रंगतदार वळणावर पोहोचले असून, गावकऱ्यांमध्ये आता “गज्या”च्या कथित नाईट ऑपरेशनची जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, “गज्या” नावाचा काल्पनिक रेतीसम्राट कोंडा फाट्यावर स्वतः बसून संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवत असल्याची चर्चा रंगली आहे.
गावकऱ्यांच्या मिश्कील म्हणण्यानुसार, रात्री अंदाजे १० वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत काही ट्रॅक्टर संशयास्पदरीत्या ये-जा करताना दिसतात. विशेष म्हणजे, या वाहनांची हालचाल इतकी “शिस्तबद्ध” असते की काहींनी तर याला “रेती एक्सप्रेस नाईट सर्व्हिस” असे नाव दिले आहे!
एका स्थानिकाने गंमतीत म्हटलं
“गज्या आता CCTV पेक्षा भारी झाला… कोंडा फाट्यावर बसून संपूर्ण ‘ऑपरेशन रेती’ कंट्रोल करतो म्हणे!”
तर दुसऱ्याने टोला लगावला
“रात्री ट्रॅक्टर इतके धावतात की, आता गावकऱ्यांना घड्याळाची गरज नाही… ट्रॉली गेली की समजायचं १२ वाजले!”
काही नागरिक सांगतात की रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरचे आवाज, धूळ आणि रस्त्यावर उमटणारे मोठमोठे टायरचे ठसे सकाळी स्पष्ट दिसतात. मात्र अधिकृत स्तरावर अजूनही एकच दावा कायम असल्याने नागरिकांमध्ये खसखस सुरू आहे
“घाटात रेतीच नाही!”
यावर एका तरुणाने भन्नाट प्रतिक्रिया दिली
“जर रेती नाही तर मग रात्री ट्रॅक्टरमध्ये बहुतेक हवा भरून नेत असतील… पण ती हवा एवढी जड कशी?”
दरम्यान, “गज्या”ची चर्चा आता सोशल मीडियावरही रंगू लागली असून काहींनी तर त्याला “रेतीचा नाईट मॅनेजर” अशी उपाधी दिली आहे.
टीप :- वरील वृत्त पूर्णतः हास्यव्यंग शैलीत लिहिलेले असून यात उल्लेख केलेली नावे, घटना व प्रसंग काल्पनिक आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा वास्तविक घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


