Friday, June 5, 2026
Homeभद्रावतीतासन्तास रस्त्यावर अडकले चालक-वाहक; एस.टी. प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

तासन्तास रस्त्यावर अडकले चालक-वाहक; एस.टी. प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

तासन्तास रस्त्यावर अडकले चालक-वाहक; एस.टी. प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

मांगली येथे सकाळी 8.25 वाजता बस बिघडली; प्रवासी निघून गेले, मात्र मदतीच्या प्रतीक्षेत चालक-वाहक दुपारपर्यंत घटनास्थळीच.

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

वरोरा आगाराची भद्रावती मार्गावरील एस.टी. बस (MH-40 Y-5162) आज सकाळी सुमारे 8.25 वाजता मांगली गावाजवळ अचानक बंद पडली. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर खासगी वाहन, ऑटो आणि अन्य साधनांच्या मदतीने आपला प्रवास सुरू ठेवला. मात्र, कर्तव्यावर असलेले चालक आणि वाहक यांना तासन्तास घटनास्थळीच थांबून राहावे लागल्याने एस.टी. प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस बंद पडताच संबंधित अधिकाऱ्यांना आणि तांत्रिक विभागाला याची माहिती देण्यात आली होती. मात्र, अनेक तास उलटूनही दुरुस्ती पथक किंवा पर्यायी व्यवस्था घटनास्थळी पोहोचली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चालक-वाहकांना उन्हातच मदतीची वाट पाहत बसावे लागले.

विशेष म्हणजे, प्रवासी आपापल्या मार्गाने निघून गेल्यानंतरही चालक आणि वाहक हे सरकारी मालमत्ता व प्रवाशांच्या सामानाची जबाबदारी सांभाळत घटनास्थळीच ठिय्या देऊन होते. अशा परिस्थितीत त्यांच्या जेवण-पाण्याची किंवा इतर कोणत्याही मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

एस.टी. महामंडळाला ग्रामीण भागातील वाहतुकीचा कणा मानले जाते. मात्र, वाहन बिघाड झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना तासन्तास मदतीशिवाय ठेवले जात असेल, तर प्रशासनातील समन्वय आणि आपत्कालीन व्यवस्थेची पोलखोल होत असल्याची चर्चा सुरू आहे.

स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त करत, “बस बंद पडणे ही तांत्रिक बाब असू शकते; पण माहिती मिळाल्यानंतरही मदत पोहोचत नसेल, तर तो निष्काळजीपणा आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

या संपूर्ण प्रकारामुळे एस.टी. प्रशासनाने चालक वाहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तातडीच्या मदत व्यवस्थेसाठी कोणती उपाययोजना केली आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!