Friday, September 11, 2026
Homeभद्रावतीभद्रावतीत बिबट्याची दहशत; "जीवितहानी झाल्यास वन विभागालाच जबाबदार धरू" इम्रान खान

भद्रावतीत बिबट्याची दहशत; “जीवितहानी झाल्यास वन विभागालाच जबाबदार धरू” इम्रान खान

भद्रावतीत बिबट्याची दहशत; वन विभाग झोपेत, नागरिक जीव मुठीत घेऊन जगताहेत!

“नागरिकांचा जीव धोक्यात… आता तरी जागे व्हा; जीवितहानी झाल्यास वन विभागालाच जबाबदार धरू!” भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांचा संतप्त इशारा

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare
मो. 9525612555

भद्रावती शहरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भद्रनाग मंदिर परिसरानंतर आता मटण मार्केट परिसरातही बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापारी वर्ग जीव मुठीत घेऊन दैनंदिन व्यवहार करत आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीतही वन विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी वन विभागाच्या ढिसाळ कारभारावर कठोर शब्दांत टीका करत तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मोनाली साने व त्यांच्या परिवारासह अनेक नागरिकांनी बिबट्याच्या हालचालीबाबत माहिती दिली असूनही वन विभाग केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरता मर्यादित असल्याचा आरोप त्यांनी केला.

इम्रान खान म्हणाले, “भद्रावतीतील नागरिक भीतीच्या छायेत जगत आहेत. बिबट्या शहरात मुक्तपणे फिरत असताना वन विभाग मात्र हातावर हात ठेवून बसला आहे. एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा हा हलगर्जीपणा असह्य आहे. जर बिबट्याच्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली, तर त्याला सर्वस्वी वन विभाग जबाबदार राहील. त्याची संपूर्ण नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी वन विभागाने स्वीकारावी.”

पुढे बोलताना त्यांनी वन विभागाला इशारा देत म्हटले की, “केवळ बैठका, पाहण्या आणि कागदी अहवाल नकोत. तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करा, वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर उपाययोजना करा. अन्यथा नागरिकांच्या रोषाला वन विभागालाच सामोरे जावे लागेल.”

दरम्यान, भद्रावती शहरातील विविध भागांत बिबट्याच्या वावराच्या चर्चेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन विभागाने यापुढे केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष आणि तातडीची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!