स्थानिकांच्या रोजगारासाठी शुभम गेडाम यांचा एल्गार; K.V.R. कंपनीसमोर बेमुदत आंदोलन
“आश्वासन नको… रोजगार हवा!” स्थानिक पुनर्वसितांचा इशारा; ३० जूनपासून निर्णायक लढा
चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
सिनाळा, मसाळा (जुना) आणि नवगाव परिसरातील स्थानिक पुनर्वसित बेरोजगारांच्या रोजगाराच्या प्रश्नाने आता आंदोलनाचे रूप धारण केले आहे. अनेक निवेदने, बैठका आणि पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी महामंत्री शुभम गेडाम यांच्या नेतृत्वाखाली दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून K.V.R. कंपनी कार्यालयासमोर बेमुदत मुक्कामी आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
आंदोलनासाठी दुर्गापूर पोलीस ठाण्याकडे अधिकृत परवानगी मागण्यात आली असून, WCL तसेच K.V.R. कंपनीला लेखी नोटीस देण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, स्थानिक पुनर्वसित बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाली; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
शुभम गेडाम यांनी स्पष्ट भूमिका घेत “स्थानिकांना रोजगारात प्रथम प्राधान्य, रिक्त पदांची पारदर्शक भरती आणि रोजगाराबाबत लेखी निर्णय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा दिला आहे.
आंदोलन पूर्णपणे शांततामय आणि संविधानिक मार्गाने होणार असून धरणे, घोषणाबाजी, जनजागृती, निवेदन सादरीकरण, सामूहिक चर्चा तसेच आदिवासी सांस्कृतिक माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. आंदोलनस्थळी आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
या आंदोलनात परमेश्वर बालाजी मडावी (गट ग्रामपंचायत सदस्य) यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक युवक, महिला आणि ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. आता प्रशासन, WCL आणि K.V.R. कंपनी स्थानिकांच्या रोजगाराच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार की पुन्हा आश्वासनांवरच वेळ मारून नेणार? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
(टीप :- हे वृत्त आंदोलनकर्त्यांनी सादर केलेल्या निवेदनाच्या आधारे तयार करण्यात आले आहे. संबंधित कंपनी किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)


