भद्रावतीत पुन्हा बिबट्याची दहशत!
स्मशानभूमी रोडवर शाळकरी मुलांच्या जीवाला धोका; तीन बकऱ्यांवर हल्ला, वन विभागाने तातडीने योग्य कारवाई करावी..! भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान यांची मागणी…
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare ,95 52 61 25 55
भद्रावती शहरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी गौतम नगर, साई नगर, डोलारा तलाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक धास्तावले होते. त्यानंतर काही परिसरात एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. मात्र, त्यानंतरही बिबट्याची दहशत कमी न होता उलट वाढतच असल्याचे चित्र समोर येत आहे.
शुक्रवारी रात्री शहरालगतच्या परिसरात भाऊराव धुळे यांच्या तीन बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्या गंभीर जखमी केल्या. या घटनेमुळे शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे.
विशेष म्हणजे, स्मशानभूमी रोड परिसरात शाळा असून दररोज शेकडो विद्यार्थ्यांची ये-जा याच मार्गाने होत असते. त्याच परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी धानकुटे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून तातडीने कारवाईची मागणी केली. यावेळी धानकुटे यांनी संबंधित परिसरात त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती इम्रान खान यांनी दिली.
इम्रान खान म्हणाले, “बिबट्याचा वाढता वावर ही अत्यंत गंभीर बाब आहे. जनावरे हल्ल्याची शिकार होत आहेत, उद्या एखाद्या निष्पाप विद्यार्थ्यावर किंवा नागरिकावर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? वन विभागाने केवळ पाहणी न करता तातडीने पिंजरे लावून गस्त वाढवावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा.”
भद्रावतीतील नागरिकांनीही वन विभागाला सहकार्य करत अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, नागरिकांचा एकच सवाल आहे
“दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?”


