एसीबीच्या कारवाईनंतरही ट्रॅक्टर वन विभागाच्या ताब्यात; ट्रॅक्टर मालकाची वनपरिक्षेत्र कार्यालयात धाव
भाजप नेते तथा माजी नगरसेवक अफझल भाई यांची वनपरिक्षेत्र कार्यालयाला भेट; ‘दस्तऐवज तयार होताच ट्रॅक्टर सोडू’ वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे
भद्रावती , न्यूज डेस्क
ट्रॅक्टर सोडवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून वन विभागातील दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडल्याच्या प्रकरणानंतरही संबंधित ट्रॅक्टर अद्याप वन विभागाच्या ताब्यातच असल्याने ट्रॅक्टर मालक भारत बोढेकर यांनी भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांची प्रत्यक्ष भेट घेत ट्रॅक्टर तातडीने सोडण्याबाबत अर्ज सादर केला.
यावेळी भाजप नेते तथा माजी नगरसेवक अफझल भाई हे देखील उपस्थित होते. त्यांनी ट्रॅक्टर मालकासह वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची भेट घेऊन ट्रॅक्टर सोडविण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर विचारणा केली.
यावर वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणातील आवश्यक दस्तऐवज अद्याप तयार करण्यात आलेले नाहीत. तसेच या प्रकरणाचा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे असून ते आल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नियमानुसार ट्रॅक्टर लवकरात लवकर सोडण्यात येईल.
एसीबीच्या कारवाईनंतरही ट्रॅक्टर मालकाला वाहनासाठी वन विभागाच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने या प्रकरणाबाबत नागरिकांमध्येही चर्चा रंगू लागली आहे. आता दस्तऐवज पूर्ण होऊन ट्रॅक्टर मालकाला वाहनाचा ताबा नेमका कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील भागात…
या प्रकरणातील संपूर्ण कालक्रम, ट्रॅक्टर जप्त होण्यापासून एसीबीच्या कारवाईपर्यंतची साखळी, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका, विलंबामागील कारणे आणि ट्रॅक्टर सोडविण्याच्या प्रक्रियेतील नेमके अडथळे याबाबतचा सविस्तर वृत्तांत सत्यशोधक न्यूजच्या पुढील भागात…


