बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई, ३ लाख २८ हजारांहून देशी-विदेशी दारूसाठा जप्त; एक आरोपी ताब्यात
बल्लारपूर, न्यूज डेस्क ✍️
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ₹३ लाख २८ हजार ७० रुपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे बल्लारपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, राजेंद्र प्रसाद वॉर्ड येथील मक्का मस्जिद ते नाग मंदिर मार्गावरून जांभळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक केली जात आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसह नाग मंदिर परिसरात सापळा रचून नाकाबंदी केली.
यावेळी टाटा इंडिगो मांझा (क्रमांक MH-34 AA-6906) हे वाहन संशयास्पदरीत्या येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवून पंचांसमक्ष झडती घेतली. वाहनाची तपासणी करताना विविध बॉक्समध्ये लपवून ठेवलेला मोठा दारूसाठा आढळून आला.
तपासादरम्यान वाहनातून ‘रॉकेट संत्रा’ कंपनीची ९० एम.एल.ची देशी दारू, तसेच ‘Sahyandri Gold Premium Whisky’ या ब्रँडच्या १८० एम.एल.च्या काचेच्या बाटल्या आणि ‘Mumbai Malt Whisky’ या ब्रँडच्या ९० एम.एल.च्या प्लास्टिक पाउचमध्ये भरलेली विदेशी दारू जप्त करण्यात आली.
पोलिसांनी वाहनासह एकूण ३ लाख २८ हजार ०७० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ख्वाजा शेख उर्फ बडे मोहम्मद शेख (वय ५२), रा. साईबाबा वॉर्ड, भेंडे नाला, बल्लारपूर याच्याविरुद्ध पो.स्टे. अप.क्र. ८२१/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार (राजुरा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे, यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, तसेच महेश कुकुडकर, फुलचंद लोधी, शांतकुमार घोसे, लखन चव्हाण यांनी केली.
अवैध दारूची वाहतूक रोखण्यासाठी बल्लारपूर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर पोलिसांचा करडा नजर असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून गेला आहे.


