Monday, October 26, 2026
Homeभद्रावतीउमेश मुसावातच्या टाटा ४०७ला पोलिसांचा ब्रेक! विनारॉयल्टी रेतीसह १ लाख ३६ हजार...

उमेश मुसावातच्या टाटा ४०७ला पोलिसांचा ब्रेक! विनारॉयल्टी रेतीसह १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेती वाहतूकदारांचा डाव फसला! उमेश मुसावातच्या टाटा ४०७ वर कारवाई; पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे साहेबांचा  दणका!

विनारॉयल्टी रेतीसह १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त!

भद्रावती, न्यूज डेस्क : शंकर बोरघरे , ९५५२६१२५५५

रेती भरून वाहन रस्त्यावर आणले, पण रॉयल्टीचा हिशेब मात्र जुळला नाही! भद्रावती शहरातील आशिर्वाद नगर परिसरात विनारॉयल्टी रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत उमेश बलवीरसिंग मुसावात (वय ४०, रा. आशिर्वाद नगर, भद्रावती) याच्या ताब्यातील टाटा ४०७ वाहनासह एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, योगेश घुगे, खुशाल चांदेकर आणि अजित देशकर यांनी केली.

गोपनीय माहिती मिळाली अन् पोलिसांनी रस्त्यावरच रचला सापळा!

१२ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, टाटा ४०७ वाहन क्रमांक MH 33 G 0911 मधून विनारॉयल्टी रेती भरून नागसेन नगरच्या दिशेने वाहतूक केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी पंचांना सोबत घेत आशिर्वाद नगर परिसरातील ताटे यांच्या घरासमोरील रस्त्यावर सापळा रचला.

काही वेळातच पांढऱ्या रंगाचे टाटा ४०७ वाहन येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये काळपट रंगाची रेती आढळली. रेतीच्या रॉयल्टीबाबत विचारणा केली असता, रॉयल्टी नसल्याचे चालकाने सांगितल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

रेती वाहतुकीचा प्रवास सुरू होता; मात्र पोलिसांच्या नाकेबंदीने त्याला ब्रेक लावला!

वाहन १ लाख ३० हजारांचे, रेती सहा हजारांची!

पोलिसांनी केलेल्या कारवाईत जुन्या पांढऱ्या रंगाच्या टाटा ४०७ वाहनाची अंदाजे किंमत १ लाख ३० हजार रुपये, तर त्यामध्ये भरलेल्या १०० घनफूट अर्थात एक ब्रास काळपट रेतीची अंदाजे किंमत ६ हजार रुपये असल्याचे नमूद आहे. अशा प्रकारे एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याशिवाय संबंधित वाहनाच्या विम्याची आणि पीयूसीची मुदत संपल्याचेही पोलीस सूत्रांकडून माहितीनुसार…! वाहनाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, मूळ कागदपत्रांऐवजी छायांकित प्रती सादर करण्यात आल्याचेही समोर आले.

उमेश मुसावातविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी उमेश बलवीरसिंग मुसावात याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाची कलमे ४८(७) व ४८(८), तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहनातून विनारॉयल्टी रेतीची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, रेतीचा स्रोत आणि वाहतुकीसंदर्भातील अन्य बाबी तपासातून स्पष्ट होणार आहेत.

पोलिसांचा दणका; आता महसूल विभागाची वेळ!

विनारॉयल्टी रेती वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई केली असली, तरी ही रेती नेमकी कुठून आणली, तिचा स्रोत कोणता आणि अवैध उत्खनन झाले होते का, याची चौकशी होणेही महत्त्वाचे आहे.

पोलिसांनी वाहन पकडले, मुद्देमाल जप्त केला; आता रेतीचा स्रोत शोधण्यासाठी महसूल विभाग काय कारवाई करतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टीप :- ही बातमी पोलिसांकडून प्राप्त प्राथमिक माहितीच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांनुसार पुढील बाबी स्पष्ट होतील.

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!