ड्रममध्ये तलवार लपवली; भद्रावती पोलिसांनी शोधून काढली!
५२.५ सेंटीमीटरची धारदार तलवार जप्त; भंगाराम वॉर्डातील मुन्ना मरसकोल्हे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
भद्रावती, न्यूज डेस्क
शंकर बोरघरे , 95 52 61 25 55
भद्रावती शहरातील एक घरात तलवार ठेवायची आणि तीही चक्क प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवून! मात्र, अशी लपवाछपवी भद्रावती पोलिसांसमोर फार काळ टिकली नाही. भंगाराम वॉर्डातील मुन्ना मारोती मरसकोल्हे (वय ५७) याच्या घरातून भद्रावती पोलिसांनी धारदार लोखंडी तलवार जप्त केली. विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक संजय मिश्रा हे पथकासह गस्तीवर असताना मुन्ना मरसकोल्हे याच्याकडे तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी भंगाराम वॉर्डात जाऊन पंचांसमक्ष घराची झडती घेतली. यावेळी घरातील एका खोलीत ठेवलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये धारदार लोखंडी तलवार आढळली.
जप्त करण्यात आलेल्या तलवारीची लांबी ५२.५ सेंटीमीटर असून तिची अंदाजित किंमत ५०० रुपये आहे. तलवारीच्या मुठीची लांबी १० सेंटीमीटर व रुंदी ८ सेंटीमीटर असल्याची माहिती आहे. तलवार बाळगण्यासाठी आवश्यक परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तलवार जप्त करून संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.
तसेच तलवारीची किंमत अवघी ५०० रुपये असली, तरी विनापरवाना शस्त्र बाळगल्याचा प्रकार स्वस्तात सुटणारा नाही. घरातील ड्रममध्ये तलवार ठेवली म्हणून पोलिसांना सुगावा लागणार नाही, असा विचार केला असेल तर तो चुकीचा ठरला. भद्रावती पोलिसांनी माहिती मिळताच कारवाई करून तलवार जप्त केली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मिश्रा, प्रेमकुमार बावनकर, शंकर घुगे, अनुप आष्टुनकर, धर्मराज मुंडे, प्रशांत शेंद्रे, देवानंद डुकरे, संतोष राठोड आणि रागिनी रायपुरे यांनी केली.
भद्रावती पोलिसांच्या या कारवाईमुळे विनापरवाना शस्त्र बाळगण्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.


