“महाराजस्व अभियान” चा गाजावाजा; भद्रावती तहसीलमध्ये मात्र नागरिकांची धावपळ कायम
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare
95 25 61 25 55
महाराष्ट्र शासनाच्या “श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत महसूल सेवा जलद, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याचे दावे केले जात असताना, भद्रावती तहसील कार्यालयात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पोस्टरवर “जलद सेवा” आणि “आपला महसूल आपले अधिकार आपली जबाबदारी” अशा घोषणा झळकत असल्या, तरी प्रत्यक्षात नागरिकांना “उद्या या… फाईल वर गेली आहे… साहेब बैठकीत आहेत…” अशीच उत्तरे मिळत असल्याचा आरोप होत आहे.
तहसील कार्यालयात सध्या फाईलपेक्षा नागरिकच जास्त फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल फिरते, नंतर पुन्हा पहिल्याच टेबलवर येते आणि शेवटी नागरिकांच्या हातात उरतो तो फक्त अर्जाचा झेरॉक्स व प्रतीक्षेचा कंटाळा!
“फेरफारासाठी अर्ज दिला, पण आता माझाच फेरफार होतोय,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने व्यक्त केली. तर दुसऱ्या नागरिकाने संताप व्यक्त करत म्हटलं, “७/१२, शेत पांदन रस्ता मीळण्यापेक्षा आता आधार कार्ड अपडेट करणं सोपं झालं आहे.”
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव आणि अंतर्गत वादाचा थेट परिणाम कामकाजावर होत आहे. अनेक फाईली दिवसन्दिवस प्रलंबित राहत असून, काही नागरिकांना साध्या दाखल्यासाठीही वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, एका शेतकऱ्याच्या पांदन रस्त्याच्या प्रकरणाने तालुक्यात वेगळीच चर्चा निर्माण केली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता मागितलेल्या शेतकऱ्याला प्रशासनाकडून रेल्वेमार्गाच्या बाजूने जाण्याचा पर्याय दाखवण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “रस्ता मागितला तर ट्रॅक दाखवतात,” असा उपरोधिक टोला आता नागरिकांकडून लगावला जात आहे.
भद्रावती तालुका हा शेतीप्रधान भाग असल्याने ७/१२ उतारे, फेरफार, वारस नोंदी आणि पीककर्जाशी संबंधित महसूल कामांना विशेष महत्त्व आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने अनेक शेतकरी कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र “टेबल टू टेबल यात्रा” संपत नसल्याने आर्थिक व्यवहार अडकत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
“महाराजस्व अभियान” अंतर्गत नागरिकांची कामे जलद मार्गी लावण्याचा शासनाचा उद्देश असला, तरी भद्रावती तहसीलमध्ये मात्र “फाईल शोधा, सही मिळवा आणि पुन्हा या” हीच नवीन कार्यपद्धती सुरू असल्याचा उपहास सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
आता जिल्हा प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन तहसील कार्यालयातील प्रलंबित कामांचा आढावा घ्यावा, अंतर्गत समन्वय सुधारावा आणि शेतकरी व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.


