महाकाली दर्शन पायी यात्रेपूर्वी मार्ग स्वच्छ करा!
भद्रावती-चंद्रपूर मार्गावर कचरा, गिट्टी व खड्यांचा खच; भाविकांच्या सुरक्षेसाठी किशोर गोवारदीपे यांची मागणी
भद्रावती , न्यूज डेस्क
चंद्रपूर येथील आई महाकालीच्या दर्शनासाठी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी भद्रावती ते चंद्रपूर पायी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने भद्रावती ते चंद्रपूर मार्गावरील कचरा, गिट्टी, खडे आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यात्रेपूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची स्वच्छता करून मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष किशोर महादेव गोवारदीपे यांनी केली आहे.
भद्रावती ते चंद्रपूर मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, रस्त्याच्या कडेला गिट्टी, दगड आणि खड्डे असल्याने पायी चालणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असल्यामुळे भाविकांना रस्त्याच्या कडेने चालावे लागते. मात्र, कचरा, दगड-गिट्टी आणि खड्ड्यांमुळे पायाला दुखापत होण्याची तसेच अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
श्रद्धेच्या यात्रेत भाविकांच्या सुरक्षेशी तडजोड नको!
१७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाकाली दर्शन पायी यात्रेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला असलेली अस्वच्छता आणि खड्डे भाविकांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे प्रशासनाने ऐनवेळी घाई करण्याऐवजी यात्रेपूर्वीच आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
यासंदर्भात किशोर महादेव गोवारदीपे यांनी संबंधित प्रशासनाकडे प्रसारमाध्यमांतून मागणी केली आहे. भद्रावती ते चंद्रपूर मार्गाच्या दोन्ही बाजूंचा कचरा तातडीने साफ करावा, रस्त्यालगत असलेली गिट्टी व मोठे खडे हटवावेत आणि आवश्यक ठिकाणी खड्डे बुजवून पायी चालण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आता प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. श्रद्धेने महाकाली दर्शनासाठी निघणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि स्वच्छ मार्ग मिळावा, यासाठी संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


