रस्त्याच्या मध्यभागी ‘धोक्याचा खांब’… !
नागरिकांचा संताप वाढला!
- भद्रावती (प्रतिनिधी):-गणपती वॉर्ड, गवराळा गाडगे महाराज मंदिर परिसरातील वासुदेव बावणे यांच्या घरासमोरील नादुरुस्त विद्युत खांब नागरिकांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरत आहे.
अनेक दिवसांपासून हा खांब रस्त्याच्या मध्यभागी झोकांड्या खात उभा असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेसह स्थानिक जनप्रतिनिधींना वारंवार निवेदने दिली; मात्र अद्याप खांब हटविण्याची कोणतीही कारवाई झालेली नाही.
जबाबदारीपासून पळ काढत नगर परिषद ‘एमएसईबीची जबाबदारी’ म्हणते, तर एमएसईबी ‘नगर परिषदेची कारवाई’ म्हणून हात वर करते. या लपंडावात मात्र धोका केवळ जनतेलाच!
प्रसंगी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण करणारा आणि सोसाट्याच्या वाऱ्यात कधीही कोसळण्याची भीती असलेला हा खांब तातडीने हटविण्याची मागणी राजू क्षीरसागर, वासुदेव बावणे, अजय क्षीरसागर, स्वच्छता समिती अध्यक्ष मंगेश येरमे तसेच जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळा येथील सदस्यांनी केली आहे.
येथील नागरिकांचा सरळ रोख-ठोक सवाल “खांब कोसळला तर जबाबदार कोण?”
आता तरी विभागीय यंत्रणा जागी होऊन तातडीने दुरुस्ती करणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे..!


