Saturday, June 6, 2026
Homeचंद्रपूरविकास ‘लापता’, पाणी ‘कधीतरी’; निवडणूक म्हणजे पंचवार्षिक उत्सव!

विकास ‘लापता’, पाणी ‘कधीतरी’; निवडणूक म्हणजे पंचवार्षिक उत्सव!

निवडणुकीनंतर…पंचवार्षिक उत्सव!

चंद्रपुर न्यूज डेस्क ✍️
प्रमोद दुबे..!

वीर सावरकर नगर, उडिया मोहल्ला, रयतवारी कॉलरी आणि इंडस्ट्रियल एरिया या प्रभाग क्रमांक ६ मध्ये गेल्या पाच वर्षांत विकासाने पायही ठेवलेला नाही, अशी खात्रीशीर माहिती नागरिकांकडून मिळत आहे. येथे विकासकामे इतकी कमी झाली आहेत की, ती दुर्बिणीतूनही दिसत नाहीत.

पाणी येणार… येणारच… पण कधी?
महानगरपालिकेने वर्षांपूर्वी रस्ते खोदून मोठी पाईपलाईन टाकली. पाईप लाईन आहे, खड्डे आहेत, पण पाणी मात्र अजूनही वाटेतच अडकले आहे.
दोन वर्षांपूर्वी बांधलेली मोठी पाण्याची टाकी सध्या शोभेची वस्तू ठरली असून, फक्त रयतवारी कॉलरीलाच दर्शन देत आहे. बाकी भागात नागरिक पाण्याकडे पाहून तहान भागवतात.

नाली आणि पाईपलाईन ; ‘स्टॉप’ मोडवर..!
नाली आणि पाईपलाईनची कामे इतकी ठप्प आहेत की, कामगारही वाट पाहून थकले असतील. अर्धवट नाल्या, साचलेले पाणी आणि दुर्गंधी..!
हेच इथले कायमस्वरूपी विकास मॉडेल बनले आहे.
टँकरराज…!
महानगरपालिकेची पाण्याची गाडी ३..४ दिवसाआड दर्शन देते. टाकी धुण्याचा कार्यक्रम महिन्या-दोन महिन्यांनी होतो. पाणी कुणाला मिळते, कुणाला नाही.
हे पूर्णपणे नशीबावर अवलंबून आहे. स्वच्छतेबाबत विचारायचे असेल तर, “पाणी आहे हेच मोठे” अशी भावना नागरिकांनी स्वीकारली आहे.

नगरसेवकांचा पंचवार्षिक दौरा..!
स्थानिक नागरिक सांगतात की, नगरसेवक पाच वर्षांत फक्त एकदाच दिसतात…!
तेही निवडणुकीच्या वेळी. हात जोडून, दार ठोठावून मते मागितली जातात. निवडणूक संपली की, नगरसेवक पुन्हा अदृश्य होतात.

५ लाखांचा निधी, ५० हजारांचे काम..!
इथे निधी येतो ५ लाखांचा, पण काम दिसते ५० हजारांचे. उरलेला निधी कुठे जातो, यावर नागरिकांनी आता प्रश्न विचारायचेही सोडून दिले आहेत. कारण उत्तर मिळण्याची शक्यता शून्य आहे.

निष्कर्ष..!
प्रभाग क्रमांक ६ मध्ये,
पाणी आहे पण येत नाही,
पाईपलाईन आहे पण चालू नाही,
नाली आहे पण उपयोगाची नाही,

आणि नगरसेवक आहेत पण फक्त निवडणुकीपुरते…!
नागरिकांचा एकच सवाल आहे
“पुढच्या पाच वर्षांत तरी विकास येणार आहे का, की तोही टँकरनेच येणार?”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!