Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरबँक ऑफ महाराष्ट्र ची वासेरा शाखा सिंदेवाही येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव; १०,...

बँक ऑफ महाराष्ट्र ची वासेरा शाखा सिंदेवाही येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव; १०, १२ गावांतील नागरिकांमध्ये नाराजी..!

पाच हजारांहून अधिक खातेदार प्रभावित होण्याची शक्यता..!

चंद्रपूर न्यूज डेस्क,

सिंदेवाही, प्रतीनीधी✍️

सचिन रामटेके

चंद्रपूर जिल्ह्यातील वासेरा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सिंदेवाही येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती स्थानिक स्तरावर समोर आली आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी या संभाव्य निर्णयामुळे परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पाच हजारांहून अधिक खातेदार प्रभावित होण्याची शक्यता

वासेरा शाखेवर सुमारे पाच हजारांहून अधिक खातेदार अवलंबून आहेत. शिवणी, पारणा, पिपरडा, कारवा, पिपरहेटी, सिंगडझरी, नवीन जामसाडा, जुना जामसाडा, मोहाळी, पांढरवाणी, गडबोरी, कोळसा, उमरवाही आदी गावांतील नागरिक या शाखेतून आपले नियमित व्यवहार करतात.

दरम्यान शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही शाखा महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. पीक कर्ज वितरण, खत खरेदीचे व्यवहार, तसेच धान विक्रीची रक्कम जमा करणे यासाठी या शाखेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. दरमहा येथे लक्षणीय आर्थिक उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते.

या शाखेमार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच विविध शिष्यवृत्ती योजनांचे लाभार्थी व्यवहार करतात. त्यामुळे शाखा स्थलांतरित झाल्यास वृद्ध, दिव्यांग आणि गरजू लाभार्थ्यांना अतिरिक्त अंतराचा प्रवास करावा लागेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

तसेच वासेरा येथून सिंदेवाहीपर्यंत अंदाजे १० ते १५ किलोमीटर अंतर आहे. ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित सुविधा असल्याने ग्राहकांना प्रवास खर्च आणि वेळ वाढण्याची शक्यता आहे.

याशिवाय शाखेवर आधीच मोठ्या प्रमाणात ग्राहक असल्याने, वासेरा शाखेचे ग्राहक तिकडे वळल्यास कामाचा ताण वाढू शकतो, अशीही चर्चा आहे.

प्रसंगी स्थानिक नागरिकांनी शाखा कायम ठेवावी किंवा पर्यायी स्वरूपात ग्राहक सेवा केंद्र, एटीएम आणि अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे. निर्णय अंतिम करण्यापूर्वी स्थानिक ग्रामपंचायती व नागरिकांशी चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रस्तावाबाबत बँक ऑफ महाराष्ट्र कडून अधिकृत स्पष्टीकरण येणे अपेक्षित आहे. निर्णयाबाबत पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!