३१ डिसेंबरनंतर पुन्हा त्याच ठिकाणी अपघात..नागरिकांमध्ये चिंता..! इम्रान खान..
भद्रावती न्यूज डेस्क 🙏
भद्रावती शहराजवळील हॉटेल जमघट परिसरात आज दुपारचा सुमारास मालवाहू ट्रक आणि हायवा ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातामुळे काही काळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. मात्र वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) संतोष बाकल यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि अवघ्या एका तासात वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावती शहराच्या सीमेवर असलेल्या हॉटेल जमघटसमोर सकाळी मालवाहू ट्रक आणि हायवा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध अडकून राहिली. त्यामुळे काही काळ संपूर्ण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
भद्रावती, चंद्रपूर आणि वरोरा मार्गावरून ये-जा करणाऱ्या ट्रक, बस, कार आणि दुचाकी वाहनांची मोठी गर्दी झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास सुरू ठेवला.
भद्रावती, चंद्रपूर आणि वरोरा या शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे अपघातानंतर काही मिनिटांतच संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली.
प्रसंगी घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ वरोरा संतोष बाकल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत पोलिस पथकाला आवश्यक सूचना दिल्या आणि वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी स्वतः स्वीकारली.
अपघातग्रस्त ट्रक हटवण्यासाठी तातडीने यंत्रसामग्री मागविण्यात आली. पोलिसांनी जेसीबीचा मदतीने दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला हलवली. त्यानंतर अडकलेली वाहने टप्प्याटप्प्याने मार्गस्थ करण्यात आली. पोलिसांच्या नियोजनबद्ध आणि जलद कारवाईमुळे सुमारे एक तासाच्या आत वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात आली.
या अपघातामुळे हॉटेल जमघट परिसर पुन्हा अपघातांच्या चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या ठिकाणी यापूर्वीही अनेकदा अपघात घडले आहेत. विशेषत, ३१ डिसेंबर रोजी याच परिसरात झालेल्या अपघाताची आठवण नागरिकांनी व्यक्त केली.
रस्त्याचे तीव्र वळण, वाढती वाहतूक आणि अनियंत्रित पार्किंग यामुळे या ठिकाणी अपघातांची शक्यता वाढते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. भद्रावतीसारख्या औद्योगिक शहराजवळील हा मार्ग अत्यंत व्यस्त असून मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करणारी वाहने या मार्गावरून सतत ये-जा करतात.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान खान यांनी हॉटेल जमघट परिसरातील काही बांधकामे आणि पार्किंग रस्त्याच्या कडेला अतिक्रमणाच्या स्वरूपात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहनांना वळण घेण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाची चौकशी करून अतिक्रमण हटवावे तसेच रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
या अपघातानंतर भद्रावती परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
रस्ता दुरुस्ती, अतिक्रमण हटाव मोहीम, वाहतूक चिन्हांची व्यवस्था आणि ट्रॅफिक नियंत्रण अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. वाढती वाहनसंख्या आणि औद्योगिक वाहतूक लक्षात घेता भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, एसडीपीओ संतोष बाकल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी वाहतूक कोंडी कमी वेळात दूर करण्यात यश आले आणि परिस्थिती नियंत्रणात आली.


