चंद्रपूर, न्यूज डेस्क
(राहुल थोरात✍️)
शहरालगत असलेल्या रामसेतू पुलिया परिसरानंतर दाताळा, देवाळा मार्गावर सध्या अंधाराचे साम्राज्य पसरले असून रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर पुरेशी स्ट्रीट लाईट व विद्युत खांब नसल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दररोज अनेक नागरिक, विद्यार्थी तसेच कामानिमित्त ये-जा करणारे वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. मात्र सूर्यास्तानंतर संपूर्ण परिसर गडद अंधारात बुडतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या झाडीमुळे अंधार अधिकच वाढतो आणि वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण जाते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून हा मार्ग रात्रीच्या वेळी धोकादायक ठरत आहे.
विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्रीच्या वेळी या मार्गाने प्रवास करताना भीतीचे वातावरण जाणवते. अंधाराचा फायदा घेत अनुचित घटना घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर स्ट्रीट लाईट बसविण्याबाबत अनेकदा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे दाताळा देवाळा मार्गावर तातडीने विद्युत खांब उभारून स्ट्रीट लाईट बसविण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. अंधारामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशीही नागरिकांची मागणी आहे.


