Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीप्रलंबित फाईल्स, तणावपूर्ण वातावरण; भद्रावती तहसील कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन..!

प्रलंबित फाईल्स, तणावपूर्ण वातावरण; भद्रावती तहसील कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन..!

“काम करायचं की रोज नवीन काम शिकायचं?” असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय.

“काम करायचं की अपमान सहन करायचा?” कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल

भद्रावती, न्यूज डेस्क✍️

भद्रावती तहसील कार्यालयातील कामकाजावर परिणाम होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले असून, तहसील कार्यालयातील १८ कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदारांच्या वर्तणुकीबाबत लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात कार्यालयातील तणावपूर्ण वातावरण, प्रलंबित फाईल्स आणि कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या मानसिक ताणाचा उल्लेख करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तहसील कार्यालयातय अनेक प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यास विलंब होत असून फाईल्स दीर्घकाळ प्रलंबित राहत आहेत. यामुळे नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयात ये-जा करावी लागत असून, त्यांच्या नाराजीचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. अंतिम निर्णय प्रक्रियेत विलंब होत असताना जबाबदारी मात्र कर्मचाऱ्यांवर येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून कर्मचाऱ्यांशी बोलताना वारंवार ओरडणे, दमदाटी करणे तसेच अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत असून त्यांच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत आहे.

तसेच, कामकाजासाठी आवश्यक मार्गदर्शन वेळेत मिळत नसल्यामुळे अनेक वेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व टेबलमध्ये वारंवार बदल करण्यात येत असल्यामुळे कामाचा ताळमेळ बिघडत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

निवेदनात ३० मार्च २०२६ रोजी नागरिकांसमोर कर्मचाऱ्यांशी अयोग्य पद्धतीने वागणूक दिल्याचा तसेच ३१ मार्च २०२६ रोजी वाहन चालकाच्या अतिरिक्त भत्त्याबाबतचा प्रस्ताव सही न करता परत केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या घटनांमुळे कार्यालयातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाल्याचे कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे.

कर्मचाऱ्यांनी “काम करायचं की अपमान सहन करायचा?” असा संतप्त सवाल उपस्थित करत संबंधित तहसीलदारांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे. अन्यथा सामूहिक आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

सदर निवेदनाच्या प्रती संबंधित मंत्री, आमदार तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले असून, पुढील निर्णय काय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!