पाहणी झाली, फेरी झाली… पण पंचनामा मात्र “रस्ताच चुकला”?
पावसाळा तोंडावर; शेतकरी रस्त्याच्या प्रतीक्षेत, तहसीलदारांविरोधात आंदोलनाचा इशारा
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
मौजा विजासन येथील शेतकरी मधुकर खरवडे यांच्या शेतरस्त्याच्या प्रकरणाने महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शेतरस्त्यासंदर्भातील हे प्रकरण तहसील कार्यालय भद्रावती येथे प्रलंबित असून, तहसीलदार भांडारकर यांनी सदर प्रकरणात सुनावणी घेतली होती.
सुनावणीनंतर ३ जून रोजी प्रत्यक्ष मौका चौकशी करण्यात आली. यावेळी कार्यालयीन लिपिक, तलाठी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. शेताची पाहणी करण्यात आली, रस्त्याची स्थिती तपासण्यात आली, परिसराची पाहणी करण्यात आली; मात्र प्रत्यक्ष पंचनामा करण्यात आला नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
यामुळे गावात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, काही नागरिकांनी याला “पंचनामा-विरहित चौकशी” असे संबोधले आहे. शेतरस्ता प्रकरणात प्रत्यक्ष पंचनामा हा महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र पाहणी होऊनही पंचनाम्याचा मागमूस नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, शेतकरी मधुकर खरवडे यांनी प्रशासनावर वेळकाढूपणाचा आरोप केला आहे. सुनावणी, चौकशी आणि प्रत्यक्ष पाहणी होऊनही शेतरस्त्याचा प्रश्न अद्याप प्रलंबितच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पावसाळा तोंडावर आला असून शेतीच्या कामांना सुरुवात होण्याची वेळ जवळ आली आहे. मात्र रस्त्याअभावी शेतात जाण्या-येण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सदर प्रकरणातील दिरंगाईमुळे तहसील प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, प्रत्यक्ष पाहणी झाली असताना पंचनामा का करण्यात आला नाही? आणि शेतकऱ्याच्या रस्त्याचा प्रश्न नेमका कधी निकाली निघणार?
दरम्यान, शेतकरी मधुकर खरवडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना इशारा दिला आहे की, “दोन दिवसांच्या आत प्रलंबित शेतरस्त्याचा प्रश्न निकाली काढून रस्ता मोकळा करून दिला नाही, तर तहसीलदार कार्यालयाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल.”
त्यामुळे विजासन येथील शेतरस्ता प्रकरण आता चांगलेच तापले असून, महसूल प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
रोखठोक :-
शेतकरी मधुकर खरवडे यांना न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. शेतरस्त्याच्या मागणीपासून ते महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीपर्यंत प्रत्येक बाबीचा वेध घेत, या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू राहील. विजासन शेतरस्ता प्रकरणातील पडद्यामागील घडामोडी, दिरंगाईची कारणे आणि जबाबदार कोण? याचा सविस्तर उलगडा ‘लोकशाही’च्या पुढील भागात…
क्रमशः…


