इम्रान खान यांनी इशारा दिला होता; आज हायवाने चिमुकल्याचा बळी घेतला!
मुख्य बाजारपेठेत काळजाचा ठोका चुकवणारी घटना; जड वाहनांना शहरात प्रवेशबंदीची मागणी पुन्हा ऐरणीवर
भद्रावती, न्यूज डेस्क
भद्रावतीच्या मुख्य बाजारपेठेत आज हायवा ट्रकच्या धडकेत एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने शहर हादरले असून, गर्दीच्या बाजारपेठेत अवजड वाहनांना मोकळा प्रवेश देण्याच्या व्यवस्थेवर आता थेट सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, हा धोका नवीन नव्हता. भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी यापूर्वीच प्रशासनाला लेखी निवेदन देऊन हायवा व दहा चाकी वाहनांना शहरात प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली होती. गर्दीच्या वेळेत जड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
मात्र, मागणी करूनही ठोस उपाययोजना झाली नाही आणि आज एका निष्पाप चिमुकल्याला जीव गमवावा लागला. त्यामुळे इम्रान खान यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर आक्रमक सवाल उपस्थित केला आहे.
“इशारा आधीच दिला होता; आता जीव गेल्यानंतर तरी सबंधीत प्रशासन जागे होणार का?”
मुख्य बाजारपेठेत नागरिक, महिला, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा गर्दीच्या भागातून हायवा आणि दहा चाकी वाहनांची वाहतूक सुरू राहणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
निवेदन दिले, धोका सांगितला; पण कारवाई झाली नाही. आज त्या दुर्लक्षाची किंमत एका चिमुकल्याला जीव देऊन मोजावी लागली, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे.
इम्रान खान यांनी शहरातील जड वाहनांच्या वाहतुकीचे तातडीने नियोजन करावे, गर्दीच्या वेळेत प्रवेशबंदी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
आता कागदावरील आदेश नको; रस्त्यावर ठोस कारवाई हवी!


