Monday, October 26, 2026
Homeभद्रावतीनागरिकांचा जीव महत्त्वाचा की हायव्यांची वाहतूक? गोवारदिपेंचा थेट सवाल

नागरिकांचा जीव महत्त्वाचा की हायव्यांची वाहतूक? गोवारदिपेंचा थेट सवाल

 जड वाहनांची मनमानी; नगर परिषद प्रशासनाला आता उत्तर द्यावेच लागणार!

चिमुकल्याच्या मृत्यूनंतर जड वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर; निवेदनातून नगर परिषदेला थेट सवाल, प्रसारमाध्यमांतूनही प्रशासनाला जाब

भद्रावती न्यूज डेस्क

शंकर बोरघरे, 95 52 61 25 55 

भद्रावती शहरातील मटण मार्केट रोडवर जड वाहनाच्या धडकेत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष किशोर महादेव गोवारदिपे यांनी पुढाकार घेत नगर परिषद प्रशासनाला निवेदनातून थेट सवाल उपस्थित केले आहेत.

“शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसा हायवा-ट्रक धावत असताना नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?”, असा सवाल गोवारदिपे यांनी उपस्थित केला. अपघातानंतर केवळ चर्चा न करता जड वाहनांच्या वाहतुकीवर ठोस नियंत्रण आणण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील बाजारपेठ, शाळा तसेच वर्दळीच्या परिसरातून दिवसा जड वाहने जात असल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे दिवसा शहरातील मुख्य मार्गांवरून हायवा, ट्रक व अन्य जड वाहनांची वाहतूक बंद अथवा नियंत्रित करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

प्रसारमाध्यमांतून नगर परिषदेला शहराध्यक्ष किशोर गोवारदिपेंचे पाच थेट सवाल!

निवेदन देताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधत किशोर गोवारदिपे यांनी नगर परिषद प्रशासनाला पाच थेट सवाल केले.

१) शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसा जड वाहनांची वाहतूक सुरूच का?

२)हायवा-ट्रकच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषदेकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या?

३) बाजारपेठ व शाळांच्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगर परिषदेकडे ठोस नियोजन आहे का?

४)यापूर्वी जड वाहनांच्या वाहतुकीबाबत मागण्या झाल्यानंतर त्यावर काय कार्यवाही करण्यात आली?

५)भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचा ठोस कृती आराखडा काय?

“चिमुकल्याचा जीव गेल्यानंतरही जर जड वाहतुकीचा प्रश्न कायम राहणार असेल, तर प्रशासन आणखी किती दुर्घटनांची वाट पाहणार?” असा रोखठोक सवालही गोवारदिपे यांनी केला.

शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आवश्यकतेनुसार परवानगी देण्यात यावी; मात्र इतर जड वाहनांच्या दिवसा होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

दरम्यान, निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांनी सहकार्य केले. यावेळी जड वाहनांच्या वाहतुकीबाबत चर्चा करण्यात आली. पोलिस प्रशासनाविषयी कोणतीही नाराजी व्यक्त न करता, नगर परिषद प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रातील वाहतूक नियोजन व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी गोवारदिपे यांनी केली.

यावेळी माजी शहराध्यक्ष प्रवीण सातपुते, माजी नगरसेवक अफजलभाई, नगरसेवक वृषाली पांढरे, नगरसेविका कविता सावरकर, भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान, चेतन गुंडावार, संजय राय, भाजयुमो शहराध्यक्ष विशाल ठेंगणे, तौसिब शेख, अमर महाकुलकर, माजी नगरसेवक मधुकर सावरनकर, संजय खारकर, चेतन स्वान, माजी नगरसेवक सत्तारभाई, राजू क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, मुकेश बनीक, गोपाल गोसवाडे, सोनल भास्कर , सुनील गौरकार, अमर महाकुलकर, आदी उपस्थित होते.

आता गोवारदिपेंनी उपस्थित केलेल्या पाच सवालांवर नगर परिषद प्रशासन काय उत्तर देते आणि जड वाहनांच्या वाहतुकीबाबत कोणता निर्णय घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!