Monday, October 26, 2026
Homeभद्रावती“बेशरमाची झाडे लावूनही रस्ता गायब; अनिल पडोळेंचा सवाल‘आता डांबर तरी कधी उगवणार?’”

“बेशरमाची झाडे लावूनही रस्ता गायब; अनिल पडोळेंचा सवाल‘आता डांबर तरी कधी उगवणार?’”

बेशरमाची झाडे लावली, खड्डे मात्र अजूनही फुलले!

पारेलवार..हनुमान नगर रस्त्याचा ‘रोड शो’ सुरूच; नगरसेवक अनिल पडोळेंची पुन्हा रस्ता सुरू करण्याची मागणी…!

पाईपलाईन झाली, पावसाळा गेला; आता डांबराचा नंबर कधी? नागरिकांचा मिश्कील सवाल

भद्रावती , न्यूज डेस्क

शंकर बोरघरे , 95 52 61 25 55 

 

पारेलवार ते हनुमान नगर रस्त्याची अवस्था पाहिली की हा रस्ता आहे की खड्ड्यांचे प्रदर्शन, असा प्रश्न पडतो. पाईपलाईनचे काम होऊन जवळपास दोन महिने उलटले, पावसानेही आपले काम केले आणि रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांची संख्या वाढली; मात्र रस्त्याच्या बांधकामाचा मुहूर्त काही केल्या लागलेला नाही.

प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक अनिल श्यामराव पडोळे यांनी या प्रश्नावर पुन्हा आवाज उठवत रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पडोळे यांनी यापूर्वी रस्त्यावर बेशरमाची झाडे लावून आंदोलन केले होते. आंदोलन झाले, बेशरमाची झाडेही आली; पण रस्त्याचे भाग्य मात्र अजूनही ‘बेशरम’च असल्याची मिश्कील चर्चा परिसरात सुरू आहे.

“रस्ता कुठे आहे?”

रस्त्याची अवस्था पाहून नागरिक कपिल कन्नमवार आणि नगरसेवक पडोळे यांच्यातील काल्पनिक मिश्कील संवाद काहीसा असा रंगतो…

कपिल कन्नमवार … “पडोळे साहेब, आपण रस्त्याचा शोध घेतोय की खड्ड्यांचा?”

पडोळे : “कपिलभाऊ, रस्ता शोधायचा असेल तर खड्डे पार करावे लागतील!”

कपिल … “मग बेशरमाची झाडे लावून काय फायदा झाला?”

पडोळे ..“झाडे लावली म्हणून तरी प्रशासनाला रस्ता आठवला! आता डांबराची पाळी आहे!”

कपिल … “पण साहेब, डांबर येईपर्यंत हे खड्डे अजून मोठे झाले तर?”

पडोळे .. “मग रस्ता नकोच… थेट जलतरण तलावाची मागणी करू!”

हा संवाद विनोदी असला तरी रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती नागरिकांसाठी गंभीर आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचते, खड्ड्यांमध्ये चिखल निर्माण होतो आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

झाडे लावून झाले; आता रस्ता लावा!

रस्त्याच्या प्रश्नावर यापूर्वी आंदोलन करूनही परिस्थितीत अपेक्षित बदल न झाल्याने आता “आंदोलनासाठी बेशरमाची झाडे नकोत, प्रत्यक्षात रस्ता हवा”, अशी नागरिकांची भावना आहे.

पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असल्याने आता रस्ता बांधकामाला कोणताही विलंब न करता सुरुवात करावी, अशी मागणी नगरसेवक अनिल श्यामराव पडोळे यांनी केली आहे.

दरम्यान, या रस्त्याची अवस्था, बेशरमाच्या झाडांचे आंदोलन आणि रस्त्याच्या रखडलेल्या कामामागची नेमकी ‘डांबरी कहाणी’ पुढे काय वळण घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पुढील भागात…

“बेशरमाची झाडे गेली, खड्डे राहिले; आता डांबर कुठे गायब झाले?” रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा पुढचा किस्सा लवकरच!

रोखठोक ऑनलाइन…सदर माहती ही सबंधीत नगरसेवक अनिल पडोळे यांच्या  माहितीनुसार….

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!