जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
ट्रॅक्टरसह ९ लाख ०८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त; सुषांत कुळमेथे ताब्यात, गजानन पिंपळकर पाहिजे आरोपी
भद्रावती, न्यूज डेस्क शंकर बोरघरे, 95 52 61 25 55
जेना नदीच्या पात्रातून बिनापरवाना रेती वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत एक ब्रास रेतीसह ट्रॅक्टर व बिनानंबरची ट्रॉली असा ९ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.४७ वाजता माहिती मिळाल्यानंतर सपोनि संजय मिश्रा, पोलीस अंमलदार प्रेमकुमार बावनकर (ब.नं. ८१६) आणि धीरज गोवर्धन पोलीस अंमलदार (ब.नं. १३०५) हे पथकासह कारवाईसाठी रवाना झाले. बेलोरा गावाजवळ दोन पंच घेण्यात आले.
रात्री सुमारे ११ वाजता जेना गावाच्या पुढे स्वराज ७७४ एफई ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ टीसी ००६ लाल रंगाच्या बिनानंबरच्या ट्रॉलीसह आढळला. ट्रॅक्टर थांबवून चालक सुषांत मुकींदा कुळमेथे (वय २६, रा. किलोनी) याची चौकशी केली असता ट्रॅक्टरमध्ये रेती असल्याचे त्याने सांगितले. रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता परवाना नसल्याचे त्याने सांगितले.
पंचांसमक्ष ट्रॉलीची पाहणी केली असता त्यामध्ये एक ब्रास रेती आढळली. ट्रॅक्टरची अंदाजे किंमत ७ लाख, ट्रॉली २ लाख आणि रेती ८ हजार रुपये असा ९ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
चौकशीत सुषांत कुळमेथे याने ट्रॅक्टर व ट्रॉली गजानन पिंपळकर, रा. जेना यांच्या मालकीची असून, जेना नाल्यातून रेती भरून अरविंदो कंपनीत खाली करण्यासाठी आपल्याला पाठविले होते, असे सांगितले.
याप्रकरणी सुषांत मुकींदा कुळमेथे याच्यावर कारवाई करण्यात आली असून गजानन पिंपळकर हे पाहिजे आरोपी आहेत. दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४७(७), ४८(८) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी कारवाई केली; आता महसूल विभाग काय करणार?
जेना नाल्यातून बिनापरवाना रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळते आणि पोलिस रात्रीच्या वेळी कारवाई करून ट्रॅक्टर पकडतात. मग महसूल विभागाच्या नजरेत हा प्रकार का आला नाही? रेती उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल यंत्रणा असताना घाट परिसरात नियमित तपासणी होते का, हा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय मिश्रा, पोलीस अंमलदार प्रेमकुमार बावनकर, धीरज तसेच पथकाने केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.


