Friday, June 5, 2026
Homeचंद्रपूरटेमुर्डा गाव पेटलं! प्रस्तावित देशी दारू दुकानाविरोधात ग्रामस्थ आक्रमक

टेमुर्डा गाव पेटलं! प्रस्तावित देशी दारू दुकानाविरोधात ग्रामस्थ आक्रमक

“गावात दारू दुकान नकोच”; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उत्पादन शुल्क विभागाकडे धडक

“गाव उद्ध्वस्त होऊ देणार नाही” ; टेमुर्डा ग्रामस्थांचा देशी दारू दुकानाला जोरदार विरोध

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
प्रा. अनंत डोंगे
📞 9765233516

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा गावात प्रस्तावित देशी दारू दुकानावरून ग्रामस्थ संतप्त झाले असून गावात तीव्र विरोधाची लाट उसळली आहे. नागरी वस्तीमध्ये देशी दारू दुकान सुरू करण्याच्या हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयात धडक देत जोरदार निवेदन सादर केले.

मयूर राजू विरुटकर व समस्त ग्रामवासी, टेमुर्डा यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी प्रशासनासमोर ठाम भूमिका घेत “गावात दारू दुकान नकोच” अशी आक्रमक भूमिका मांडली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दिनांक 27 मार्च 2026 रोजी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या आदेशानुसार बंगाली कंत्राट, चंद्रपूर येथील देशी दारू दुकान (CL-II) टेमुर्डा गावातील नागरी वस्तीमध्ये स्थलांतरित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी दारू दुकान प्रस्तावित आहे त्या परिसरात शाळा, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, तलाठी कार्यालय, खासगी दवाखाने, मंदिर, आठवडी बाजार तसेच महिला व लहान मुलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे हा परिसर अत्यंत संवेदनशील असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामसभेत यापूर्वीच दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आलेला असताना ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. “दारू दुकान सुरू झाल्यास गावात भांडणे, गोंधळ, महिलांना त्रास, युवकांचे व्यसनाधीनतेकडे झुकणे आणि सार्वजनिक शांतता धोक्यात येणे अपरिहार्य आहे,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने स्थळ पाहणी करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच संबंधित दारू दुकान सुरू होण्यापूर्वी पोलीस अहवाल तयार करून गावातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, या आंदोलनात महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. “गाव उद्ध्वस्त करणारा निर्णय प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!