“खरच तो, “चांगला माणूस आहे”;
भद्रावती – वरोरा (प्रतिनिधी):-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना पुन्हा एकदा जुना पण गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. “पैसा असेल तरच निवडणूक लढवावी का?” हा प्रश्न आजच्या राजकारणाच्या वास्तवात अधिक गंभीर बनला आहे. गावपातळीवर अथक परिश्रम घेऊन समाजासाठी काम करणारे अनेक कार्यकर्ते निवडणुकीच्या वेळी मात्र मागे पडतात.
कारण त्यांच्याकडे पैसा नसतो, भव्य जाहिरात मोहीम नसते, गाड्यांचा ताफा नसतो. त्यांच्याकडे असते ती फक्त प्रामाणिक सेवा भावना आणि जनतेचा विश्वास. पण दुर्दैवाने मतदानाच्या वेळी तो विश्वास पैशाच्या झगमगाटात हरवतो.
आज प्रत्येक निवडणूक ही खर्चिक स्पर्धा बनली आहे. प्रचारासाठी वाहनं, बॅनर, पोस्टर, जेवणावळी, माणसांना फिरवणे या सर्वासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. परिणामी, आर्थिक पाठबळ नसलेले कार्यकर्ते सुरुवातीपासूनच मागे पडतात.
शिवाय हेच कार्यकर्ते वर्षानुवर्षे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात, पण मतदानाच्या वेळी मतदार फक्त एवढेच म्हणतात “तो चांगला माणूस आहे” आणि मत मात्र पैशावर किंवा गटबाजीत आधारलेल्या उमेदवारांनाच देतात.
लोकशाहीत मतदार राजा असतो, पण जर त्यानेच आपले भान गमावले, तर लोकशाहीचं मोल हरवते.
पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात आणि नंतर ती वसूल करतात.
त्यामुळे विकासाच्या प्रश्नांवर दूरगामी परिणाम होतात. मतदारांनी सज्ज होण्याची हीच योग्य वेळ आहे. समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्यांना खरा पाठिंबा मिळावा, विकासाला प्राधान्य देणारं मतदान व्हावं, ही आजची गरज आहे.
अनेक कार्यकर्ते आपल्या गावात आणि मतदारसंघात लोकांमध्ये काम करून नाव कमावतात. परंतु तिकीट वाटपाच्या वेळी गटबाजी, आर्थिक ताकद, वरच्या स्तरावरील शिफारसी आणि राजकीय सौदे यांनाच प्राधान्य दिलं जातं. परिणामी, जमिनीवर कार्य करणारे खरे कार्यकर्ते उपेक्षित राहतात. त्यांना “तू तर आपला आहेस” या एका वाक्यात गप्प केलं जातं. हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे नेतृत्वाची मानमरातब राखतात, सभा सजवतात, बॅनर लावतात, प्रचारात झटतात, पण निर्णायक क्षणी दरवाजे त्यांच्या चेहऱ्यावरच बंद होतात.
निवडणुका म्हणजे समाजसेवेचं व्यासपीठ असावं, पैसेवाल्यांची मक्तेदारी नव्हे. मतदारांनी सज्ज व्हावं, आपल्या मताचा उपयोग प्रामाणिक व काम करणाऱ्या उमेदवारासाठी करावा.
कारण, लोकशाहीचा खरा राजा मतदार आहे. आणि मतदार राजानेच योग्य निर्णय घ्यायचा असतो!


