खासदार प्रतिभा धानोरकर यांची संसदेमध्ये कडक टीका
चंद्रपुर/ भद्रावती (प्रतीनीधी):- वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हजारो शेतकरी संकटात अडचणीत आहेत.
या गंभीर विषयावर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काल संसदेत थेट आवाज उठवला.ह
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सभागृहात विधान केले की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून केंद्राकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत खासदार धानोरकर म्हणाल्या, “भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषिमंत्री पद अत्यंत जबाबदारीने चालवले जाणारे आहे. इतक्या महत्त्वाच्या पदावर बसलेला मंत्री जर लोकशाहीच्या मंदिरात असे बेजबाबदार वक्तव्य करतो, तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “जर राज्याने प्रस्तावच पाठवला नसेल, तर केंद्राने मदत ही जाहीर कशी केली? केंद्राने मदत जाहीर केली असल्याने हे स्पष्ट होते की राज्यातून नक्कीच प्रस्ताव आला होता. अशा संदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केलेले विधान हे शेतकऱ्यांना धोका पोहचवणारे असून दिशा भुलवणारे आहे.”
अतिवृष्टीच्या या संकटातून उभ्या राहणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीची मदत लागलेली आहे. त्यामुळे केंद्राकडून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देणे योग्य नाही, असे खासदार धानोरकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त करत म्हटले की, “शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत माझा आवाज संसदेत आणि जनतेसमोर ठाम राहणार आहे.”
शेतकऱ्यांच्या आर्थिक त्रासावर लक्ष केंद्रित करत चंद्रपूर जिल्ह्यात नुकसानीची भरपाई व मदत यासाठीही त्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे वारंवार मागणी केली आहे. अलीकडेच त्यांनी चंद्रपूरमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने ९३ कोटींची मदत मिळविण्यासाठी देखील प्रयत्न केले आहेत.
आताच्या परिस्थितीत केंद्रीय कृषिमंत्र्यांचे विधान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उदासीनता दर्शवते असा आरोप काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाने देखील केला आहे. शिवाय, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन राबवले असून शेतकरी हितासाठी तातडीने आर्थिक मदत व कर्जमाफीसह इतर उपाययोजना यांची मागणी केली आहे.


