वनक्षेत्रालगत रात्री ट्रॅक्टरची वर्दळ; प्राचीन नाल्याभोवती वाढलेल्या हालचालींनी चर्चा
भद्रावती न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यातील वनक्षेत्राला लागून असलेला प्राचीन मांगली नाला अलीकडच्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी या नाल्याच्या परिसरात ट्रॅक्टरची वर्दळ वाढल्याचे दिसत असून त्यामुळे विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
मांगली नाला हा परिसरातील जुना आणि नैसर्गिक जलमार्ग म्हणून ओळखला जातो. वनक्षेत्राच्या सीमेलगत असल्यामुळे या भागाचे पर्यावरणीय महत्त्वही मोठे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत नाल्याच्या परिसरात वाहनांची ये-जा होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
काही ग्रामस्थांच्या माहितीनुसार, काही युवक ट्रॅक्टरसह नाल्याच्या परिसरात दिसत असल्याने नाल्यातून रेती काढली जात असल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, मांगली नाला हा परिसरातील महत्त्वाचा नैसर्गिक जलमार्ग असल्यामुळे त्याचे जतन व संरक्षण होणे गरजेचे आहे. त्यामुळे या भागात सुरू असलेल्या हालचालींबाबत प्रशासनाने लक्ष देऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महसूल विभाग, वन विभाग व पोलिस प्रशासनाने मांगली नाल्याच्या परिसराची पाहणी करून वास्तव परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.
मांगली नाल्यात रात्री दिसणाऱ्या ट्रॅक्टर हालचालींचा नेमका प्रकार काय?
स्थानिकांकडून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती…
लवकरच वाचा या बातमीचा पुढील भाग.


