मुख्य बातमी
“आजचा थोडासा त्रास सहन करा; पण उद्या भद्रावतीला पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही” नगराध्यक्ष प्रफुल चटकी
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare
95 25 61 25 55
भद्रावती शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले. अमृत २.० पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे ही शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रफुल चटकी म्हणाले की, “आज नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मात्र हा त्रास तात्पुरता असून भविष्यात भद्रावतीकरांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे. पुढील २५ वर्षांचा पाणीप्रश्न लक्षात घेऊनच ही कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “पूर्वी काही महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत. विशेषतः वर्धा नदी पात्रातील पाईपलाईन जोडणी आणि तांत्रिक बाबींमध्ये उशीर झाल्यामुळे आता उन्हाळ्यात तातडीने काम करावे लागत आहे. मात्र नागरिकांच्या भविष्यासाठी आवश्यक असलेले निर्णय घेण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे.”
नदी पात्रातील कामादरम्यान माती खचल्याच्या घटनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “कामगारांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि सुरक्षेला प्राधान्य देत काम तात्पुरते थांबविण्याचे आदेश दिले. आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्यानंतरच काम पुन्हा सुरू करण्यात आले.”
प्रफुल चटकी यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत सांगितले, “आजचा थोडासा त्रास सहन करा, पण उद्या भद्रावतीला पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. शहराच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
दरम्यान, प्रशासनाने लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


